श्री स्वामी समर्थ सेवा संस्थान ट्रस्ट, अक्कलकोट ही संस्था स्वामी भक्ती, सेवा आणि करुणेच्या त्रिसूत्रीवर आधारित एक पवित्र सेवाभावी चळवळ आहे. अक्कलकोट नगरी ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी असून, या पवित्र भूमीतूनच समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून या संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वामी समर्थांचा उपदेश – “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” – हा केवळ शब्दांचा आधार नसून जीवन जगण्याचा मार्ग आहे. या उपदेशातून प्रेरणा घेऊन गरजू, निराधार, वृद्ध, आजारी आणि गोमातेच्या सेवेसाठी एक संघटित व्यासपीठ निर्माण व्हावे, या पवित्र हेतूने श्री स्वामी समर्थ सेवा संस्थान ट्रस्टची मुहूर्तमेढ रोवली गेली. संस्थेच्या स्थापनेमागे कोणताही व्यावसायिक किंवा वैयक्तिक स्वार्थ नसून, केवळ स्वामी सेवाच ध्येय मानून ही वाटचाल सुरू झाली. प्रारंभी अत्यंत मर्यादित साधनसंपत्ती, अल्प मनुष्यबळ आणि केवळ श्रद्धेच्या भांडवलावर संस्थेने कार्य सुरू केले. परंतु स्वामींच्या कृपेने आणि भक्तांच्या सहकार्याने हळूहळू सेवाकार्य विस्तारत गेले. संस्थेने वृद्धाश्रम, गोसेवा, अन्नदान, आरोग्यसेवा, धार्मिक उपक्रम, पूजाअर्चा, अभिषेक, आरती तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. येथे राहणाऱ्या वृद्धांना केवळ निवारा नाही तर सन्मान, माया आणि आपुलकीचे कुटुंब दिले जाते, हीच संस्थेची खरी ओळख आहे. आज श्री स्वामी समर्थ सेवा संस्थान ट्रस्ट ही केवळ एक संस्था नसून, ती स्वामी भक्तीने जोडलेले एक कुटुंब बनले आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि सेवाभावी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संस्था भविष्यातही समाजहितासाठी, धर्मकार्यासाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत राहील, हीच स्वामीचरणी प्रार्थना. संस्थेची अधिकृत नोंदणी दिनांक १९ ऑगस्ट २०१५ रोजी सहायक धर्मादाय आयुक्तालय, सोलापूर येथे करण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक F-2647 असा आहे. या नोंदणीमुळे संस्थेच्या सेवाकार्यास अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आणि समाजसेवेच्या कार्याला एक भक्कम कायदेशीर आधार मिळाला. संस्थेच्या कार्यकारिणी मंडळामध्ये एकूण ११ सदस्य असून, हे सर्व सदस्य उच्च शिक्षित, अनुभवी तसेच आजी व माजी नोकरदार वर्गातील आहेत. प्रत्येक सदस्य समाजप्रती असलेली जबाबदारी, सेवा वृत्ती आणि प्रामाणिकपणा या मूल्यांवर विश्वास ठेवून कार्य करतो. विविध क्षेत्रातील अनुभवामुळे संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्त आणि दूरदृष्टी दिसून येते, ही संस्थेची मोठी ताकद आहे. या सर्व सेवाभावी कार्यामागे स्वामी समर्थांची अखंड कृपा, भक्तांचा विश्वास आणि सेवेकऱ्यांचे निःस्वार्थ योगदान हेच खरे बळ आहे.
खालील दिलेली सर्व माहिती संस्थेमार्फत चालवण्यात येणारे उपक्रम किंवा भविष्यात करावयाचे उपक्रम दर्शवत आहे, आपण खालील माहिती वर क्लिक करून संबंधित उपक्रमाची माहिती पाहू शकता व उपक्रमासाठी आर्थिक पुण्यदान देऊ शकतात